Search for a command to run...
सहकारी संस्था या भारताच्या ग्रामीण व शहरी विकासाचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहेत. शेती, बँकिंग, किरकोळ व्यापार, दुग्ध व्यवसाय, साखर उद्योग, गृहनिर्माण अशा विविध क्षेत्रांमध्ये सहकारी संस्थांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. परंतु सहकार क्षेत्राला दीर्घकाळापासून असलेली सर्वात मोठी आव्हाने म्हणजे पारदर्शकतेचा अभाव, राजकीय हस्तक्षेप, व्यवस्थापनातील कमकुवतपणा आणि उत्तरदायित्वाची कमतरता. या समस्या संस्थांच्या कार्यक्षमतेला आणि त्यांच्या मूळ उद्देश असलेल्या "सर्वसमावेशक विकासाला" बाधा आणतात. या संशोधनात सहकारी संस्थांमध्ये पारदर्शकता, सुशासन (Good Governance), भ्रष्टाचारनियंत्रण, आर्थिक पारदर्शकता, सभासद सहभाग, लोकशाही व्यवस्थापन, डिजिटलायझेशन, लेखापरीक्षण यंत्रणा आणि जबाबदार नेतृत्वाचा सहकारी संस्थांच्या सर्वसमावेशक विकासावर होणारा परिणाम अभ्यासण्यात आला आहे. अभ्यासातून असे दिसून आले की ज्या संस्थांमध्ये पारदर्शक व्यवहार, डिजिटल व्यवहार पद्धती, नियमित लेखापरीक्षण, कार्यक्षम संचालक मंडळ आणि सभासद सहभाग अधिक आहे, त्या संस्थांमध्ये आर्थिक वाढ, नफा, रोजगारनिर्मिती, लाभांचे समसमान वितरण, सामाजिक न्याय आणि संस्थेवरील सभासदांचा विश्वास अधिक दृढ आढळतो. उलटपक्षी, पारदर्शकतेचा अभाव असलेल्या संस्थांमध्ये गैरव्यवस्थापन, भ्रष्टाचार, आर्थिक अनियमितता, सभासदांचा अविश्वास आणि संस्थेच्या विकासात घसरण दिसून येते. अभ्यासानुसार असे स्पष्ट होते की सहकारी संस्थांमध्ये सुशासनाची अंमलबजावणी केल्यास सर्व स्तरातील सभासदांना समान सहभाग मिळतो, आर्थिक संसाधनांचे योग्य व्यवस्थापन होते आणि समाजाच्या दुर्बल घटकांना विकासप्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळते. म्हणून पारदर्शकता आणि सुशासन हे सहकारी संस्थांच्या सर्वसमावेशक विकासासाठी अत्यंत आवश्यक घटक आहेत.