Search for a command to run...
सारांश (Abstract):प्रस्तुत संशोधन लेखात पंढरपूर तालुक्यातील चिंचणी गावातील दुर्लक्षित कृषी पर्यटन स्थळांचे भौगोलिक विश्लेषण करण्यात आले आहे. पर्यटन हा २१ व्या शतकातील वेगाने विकसित होणारा उद्योग असून ग्रामीण भागाच्या आर्थिक उन्नतीसाठी कृषी पर्यटन हा प्रभावी पर्याय म्हणून उदयास आला आहे. चिंचणी गाव नैसर्गिक साधनसंपत्ती, सुपीक जमीन, फळबागा, पशुपालन, पारंपरिक शेतीपद्धती व ग्रामीण संस्कृती यांसारख्या वैशिष्ट्यांनी समृद्ध असूनही पर्यटनाच्या दृष्टीने अपेक्षित विकास झालेला नाही.या अभ्यासाचा मुख्य उद्देश चिंचणी गावातील कृषी पर्यटन स्थळांची सद्यस्थिती जाणून घेणे, त्यांच्या भौगोलिक वैशिष्ट्यांचे विश्लेषण करणे, विकासातील अडचणी ओळखणे व शाश्वत विकासासाठी उपाययोजना सुचविणे हा आहे. संशोधनासाठी प्राथमिक (मैदानी सर्वेक्षण, मुलाखती, निरीक्षण) व द्वितीयक (शासन अहवाल, गॅझेटिअर, संदर्भग्रंथ) माहितीचा वापर करण्यात आला आहे. अभ्यासातून असे आढळून आले की जाहिरात व प्रसिद्धीचा अभाव, पायाभूत सुविधांची कमतरता, पर्यटन व्यवस्थापन प्रशिक्षणाचा अभाव, स्थानिक मार्गदर्शकांची अनुपलब्धता व शासन योजनांची अपुरी माहिती या कारणांमुळे चिंचणीतील कृषी पर्यटन अपेक्षित स्तरावर विकसित झालेले नाही. तथापि, अधिकृत नोंदणी, ग्रामीण होमस्टे संकल्पना, स्थानिक उत्पादनांचे ब्रँडिंग, डिजिटल प्रचार, महिलांच्या स्वयं-सहाय्यता गटांचा सहभाग व वार्षिक कृषी पर्यटन महोत्सव अशा उपाययोजना राबविल्यास चिंचणी गाव शाश्वत व रोजगारनिर्मिती करणारे आदर्श कृषी पर्यटन केंद्र म्हणून विकसित होऊ शकते.एकूणच, चिंचणी गावात कृषी पर्यटन विकासासाठी भौगोलिक, आर्थिक व सांस्कृतिक क्षमता मुबलक प्रमाणात उपलब्ध असून योग्य नियोजन व स्थानिक सहभागाच्या आधारे हे दुर्लक्षित स्थळ भविष्यात समृद्ध कृषी पर्यटन केंद्र म्हणून उदयास येऊ शकते.